PMC Election Result : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भाजपने एकूण १२ पैकी तब्बल ९ जागांवर विजय मिळवत या भागावर आपले वर्चस्व कायम राखले. काँग्रेसला केवळ १, तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागले. मनसे तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना या भागात खातेही उघडता आले नाही.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काशेवाडी-डायस प्लॉट (प्रभाग २२), रविवार पेठ-नाना पेठ (प्रभाग २३) आणि कसबा गणपती-कमला नेहरू रुग्णालय (प्रभाग २४) हे तीन महत्त्वाचे प्रभाग येतात. या तिन्ही प्रभागांमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळाली. मात्र विरोधी पक्षांमधील मतविभाजनाचा थेट फायदा भाजपला झाला आणि भाजपची घोडदौड रोखण्यात विरोधक अपयशी ठरले.
प्रभाग २२ मध्ये बागवे दाम्पत्याला मोठा धक्का
या प्रभागात भाजप आणि काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत कडवी झुंज झाली. अंतिम फेरीत काँग्रेसचे नेते अविनाश बागवे यांचा ‘ड’ गटातून भाजपच्या विवेक यादव यांनी अवघ्या ६२ मतांनी पराभव केला. तसेच ‘अ’ गटात अविनाश बागवे यांच्या पत्नी इंदिरा बागवे यांनाही भाजपच्या मृणाल कांबळे यांनी २३२ मतांनी मात दिली.
काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे ‘ब’ गटात रफिक शेख यांनी भाजपच्या संदीप लडकत यांचा पराभव करत विजय मिळवला. मात्र ‘क’ गटात काँग्रेसचे दिलशाद जुबेर बाबू कडवी यांना भाजपच्या अर्चना पाटील यांच्याविरोधात पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतविभाजनाचा फायदा येथेही भाजपलाच झाला.
प्रभाग २३ मध्ये राष्ट्रवादीची आघाडी
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची सरशी काही अंशी रोखली. ‘ड’ गटातून भाजपचे विशाल धनवडे यांनी मोठा विजय मिळवला, तर शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ‘क’ गटात राष्ट्रवादीच्या लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या ऋतुजा गडाळे यांचा १४१ मतांनी पराभव केला. ‘ब’ गटात सोनाली आंदेकर यांनी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांवर मात केली. मात्र ‘अ’ गटात महाविकास आघाडीतील मतभेदांचा फायदा घेत भाजपच्या पल्लवी जावळे विजयी झाल्या.
प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकरांची सरशी
या प्रभागात भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांच्यात प्रतिष्ठेची लढत होती. मात्र पहिल्याच फेरीपासून भाजपच्या चारही उमेदवारांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. गणेश बिडकर, देवेंद्र वडके, उज्ज्वला यादव आणि कल्पना बहिरट यांनी येथे विजय मिळवला, तर माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला.
पुनर्मोजणीची मागणी, पोलिसांचा बंदोबस्त
प्रभाग २२ मध्ये शेवटच्या फेरीत पराभव झाल्यानंतर बागवे दाम्पत्याने पुनर्मोजणीची मागणी केली. मात्र नियमांनुसार पुनर्मोजणीची तरतूद नसल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला. निकालानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


