Sonali Andekar Daughter: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भवानी पेठ प्रभाग क्रमांक २३ मध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहेत. सर्व आव्हानांना बाजूला सारत आंदेकर कुटुंबाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनीही आपापल्या प्रभागात विजयाचा गुलाल उधळला आहे.
‘सत्याचा विजय झाला’; वनराज यांच्या मुलीची भावूक प्रतिक्रिया
आईच्या विजयाची बातमी समजताच वनराज आंदेकर यांच्या मुलीला आपला आनंद आवरता आला नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, ‘मी सर्वात आधी जनतेचे आभार मानते, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आज हे सिद्ध झाले की नेहमी सत्याचाच विजय होतो. माझ्या आईवर लोकांनी जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. दिलेली सर्व आश्वासने आणि विकासकामे आम्ही पूर्ण करू.’
लक्ष्मी आंदेकर ८१ मतांनी विजयी
या निवडणुकीत प्रभाग २३-क मध्ये अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या उमेदवार ऋतूजा गडाळे यांचा अवघ्या ८१ मतांच्या फरकाने पराभव केला. लक्ष्मी आंदेकर यांना ९८३३ मते मिळाली, तर गडाळे यांना ९७५२ मतांवर समाधान मानावे लागले. सासूपाठोपाठ आता सुनेनेही (सोनाली आंदेकर) विजय मिळवल्याने आंदेकर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव मिरवणुकीवर बंदी
आंदेकर घराण्यातील दोन्ही उमेदवारांच्या विजयानंतर परिसरात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत. परिसरात कोणत्याही प्रकारची विजय मिरवणूक किंवा जाहीर जल्लोष करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही, आंदेकरांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपला आनंद व्यक्त केला.
स्थानिक नागरिकांचा कौल
आंदेकर कुटुंबीयांनी या भागात नेहमीच सामान्यांची कामे केली आहेत. संकटकाळात ते धावून येतात, त्यामुळेच जनतेने पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या निकालामुळे पुणे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आंदेकर कुटुंबाची चर्चा रंगली आहे.


