ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या निवासस्थानी शुक्रवारी पत्रकार परिषद सुरू होती. यावेळी एक अज्ञात व्यक्ती मोबाईलच्या कॅमेऱ्यातून पत्रकार परिषदेसह उपस्थितांचे चित्रीकरण करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी आव्हाड यांनी त्यास जाब विचारत त्या व्यक्तीची चौकशी केली, तेव्हा तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील कर्मचारी असल्याचे उघड झाले. या प्रकाराने संतापलेल्या आव्हाडांनी तत्काळ कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून या प्रकाराचा जाब विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी चित्रीकरण करत असताना, एक अज्ञात व्यक्ती पत्रकारांच्या घोळक्यात शिरून त्याच्या भ्रमणध्वनीमधून पत्रकार परिषदेसह तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. तेव्हा जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना त्याचा संशय आला. त्यांनी त्याला बाजूला करत त्यांच्याकडे विचारणा सुरू केली. त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी ही बाब आव्हाड यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर त्वरित आव्हाड यांनी त्याला बोलावून त्यांची चौकशी केली.
यावेळी या व्यक्तीने तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील वर्तकनगर विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती दिली. त्याच्या या उत्तराने संतापलेल्या आव्हाड यांनी तुम्ही माझ्या घरात शिरून चित्रीकरण कसे करू शकता? याची तुम्हाला कोणी परवानगी दिली?’ अशा प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चित्रीकरण केल्याची माहिती त्याने दिली. तसेच जोपर्यंत सूचना देणारा अधिकारी येत नाही; तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला तिथेच थांबवून ठेवण्याची भूमिका आमदार आव्हाड यांनी घेतली. अखेर त्या कर्मचाऱ्याच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होऊ नये ‘म्हणून त्याला सोडून दिले.


