नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात माजी खासदार परवेश वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पहिल्या यादीत 29 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. गांधीनगरचे विद्यमान आमदार अनिल बाजपेयी यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी अरविंदर सिंग लवली तेथून निवडणूक लढवणार आहेत. अनिल गोयल यांना कृष्णा नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
परवेश वर्मा हे माजी खासदार आहेत. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते साहेब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. नुकतेच त्याच्यावर राहत्या घरी महिलांना पैसे वाटल्याचा आरोप झाला होता. नवी दिल्ली मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची आहे. काँग्रेसने संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. संदीप दीक्षित हे माजी खासदार आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत.
यावेळी दिल्लीतील निवडणूक लढत तिरंगी होणार आहे. काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढत आहे. त्याचबरोबर भाजपही चांगलाच आक्रमक आहे. पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आप सरकार रोज नवनवीन योजना जाहीर करत आहे. शनिवारीच आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील पाण्याची बिले माफ करण्याची घोषणा केली आहे. आप आणि काँग्रेसने आपले उमेदवार आधीच जाहीर केले आहेत.


