Chandrashekhar Bawankule : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. शेती व पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले असून हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश महसूल व वन विभागाने जारी केले आहेत.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेताना लागणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी होणार आहे. पीक कर्जासाठी आवश्यक असलेले करारनामा, गहाणखत, तारण, हमीपत्र तसेच गहाण सूचनापत्रांवर आता कोणतेही मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे शेतकरी वर्गात स्वागत होत आहे.
दरम्यान, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील पवित्र समाधीस्थळाच्या विकासासाठीही शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची 0.87 हेक्टर 20 आर जमीन समाधीस्थळ विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याबदल्यात कोंढापुरी येथील 81 आर जमीन के.ई.एम. रुग्णालयाला कब्जेहक्काने देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
धर्म, इतिहास आणि आरोग्य यांचा समतोल साधणारा हा निर्णय असून, यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास वेगाने होईल आणि भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय, अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे 3 कोटी 69 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अमरावती जिल्ह्यात पक्षाला अधिक बळ मिळाल्याचे चित्र आहे.


