Kalyan Dombivli Election : महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असतानाच, महायुतीमधील जागावाटपाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मुंबईनंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठी (केडीएमसी) भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील फॉर्म्युला अखेर ठरला असून, येथे शिंदे गटाने भाजपपेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.
असा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला
दोन्ही पक्षांतील प्रदीर्घ चर्चेनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत असेल.
शिवसेना (शिंदे गट): ६८ जागा
भारतीय जनता पक्ष: ५४ जागा
या दोन्ही पक्षांना आपल्या कोट्यातूनच मित्रपक्षांची सोय करावी लागणार आहे. जागावाटपाचा हा निर्णय अंतिम झाला असून, लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
हेही वाचा – PMC Election : पुण्यात नवा पॅटर्न! महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार
कुरघोडीच्या राजकारणावर पडदा?
निवडणूक जाहीर झाल्यापासून कल्याण-डोंबिवलीत दोन्ही मित्रपक्षांमध्ये कमालीचा तणाव पाहायला मिळाला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये खेचले होते, तर शिंदे गटानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, हे प्रकरण थेट दिल्लीपर्यंत पोहोचले होते. अखेर वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही पक्षांनी नरमाईची भूमिका घेत युतीवर शिक्कामोर्तब केले.
भाजप कार्यकर्त्यांत नाराजी, शिंदे गटात उत्साह
दरम्यान, या निर्णयामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानिक भाजप कार्यकर्ते सुरुवातीपासूनच ‘स्वबळा’चा नारा देत होते, मात्र जागावाटपात शिंदे गटाला झुकते माप मिळाल्याने भाजप गोटात काहीसा हिरमोड झाला आहे. याउलट, भाजपच्या बालेकिल्ल्यात अधिक जागा मिळवण्यात यश आल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुंबईत भाजपचे वर्चस्व
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गट वरचढ ठरला असला तरी, मुंबई महापालिकेत मात्र भाजपने आपली ताकद कायम ठेवली आहे. मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी भाजप १३७ जागांवर, तर शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे. आज शेवटचा दिवस असल्याने दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप तातडीने पूर्ण केले जात असून, काही तासांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.


