मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर शनिवार आणि रविवार (२५-२६ ऑक्टोबर) दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असताना, हवामानातील अचानक बदलामुळे राज्याच्या इतर भागांतही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पावसाचा सर्वाधिक प्रभाव कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दिसून येण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने वादळी वारे (४०-५० किमी/तास) वाहण्याचीही शक्यता आहे. शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी, अवकाळी असल्याने कापणीच्या कामात अडथळा येऊ शकतो. हवामान विभागाने यासंदर्भात विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे सांगितले आहे.
‘या’ जिल्ह्याना यलो अलर्ट
२५ ऑक्टोबर : नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर
२६ ऑक्टोबर : मुंबई, नाशिक, खानदेश (धुळे, नंदुरबार), अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड
२७ ऑक्टोबर : धुळे, मुंबई, नाशिक, खानदेश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर
२८ ऑक्टोबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, नांदेड
हा पाऊस राज्यातील दमट वातावरण आणि ऑक्टोबर हीटमुळे अधिक त्रासदायक ठरू शकतो. शेतकऱ्यांनी कापलेले धान्य ओल्या हवेमुळे बुरशीला बळी पडू नये यासाठी हवेशीर जागेत साठवणूक करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अपडेटनुसार, हा पाऊस २८ ऑक्टोबरनंतर हळूहळू मंदावण्याची शक्यता आहे, तरीही नागरिकांनी स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे.


