Murlidhar Mohol Surgery: केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील एक महिना सक्तीच्या विश्रांतीवर जावे लागणार आहे. कोल्हापुरात कुस्ती खेळताना २९ वर्षांपूर्वी झालेल्या एका जुन्या दुखापतीचा त्रास अचानक वाढल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी, डॉक्टरांनी त्यांना पुढील ३० दिवस जनसंपर्कापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.
मैदानातील ती जखम पुन्हा बळावली
मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. १९९७ मध्ये कोल्हापूरच्या लाल मातीत कुस्ती खेळताना त्यांना गंभीर दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे त्यांचा पैलवानकीचा प्रवास अर्ध्यावर थांबला आणि ते राजकारणाकडे वळले होते. अनेक वर्षे या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यावर, आता हा त्रास असह्य झाल्याने शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य ठरले.
संसदेचे अधिवेशन आणि महाराष्ट्र केसरीला मुकणार
शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घ्यावी लागल्याने मोहोळ यांनी हळहळ व्यक्त केली आहे. सध्या दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे, तर पुण्यात कुस्तीचा महाकुंभ असलेली ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा रंगणार आहे. एका माजी पैलवानासाठी ही मोठी संधी होती, मात्र या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडींच्या वेळी सक्रिय राहता येणार नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. शारीरिक दुखापतीपेक्षा संसदेत उपस्थित राहता न येणे आणि महाराष्ट्र केसरीच्या आखाड्याला मुकावे लागल्याची रुखरुख मनाला अधिक बोचतेय, अशा भावना मोहोळ यांनी व्यक्त केल्या.
क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती !
२९ वर्षांपूर्वी… कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली… इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे… pic.twitter.com/VX7a6VAMDR
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 14, 2026
लवकरच लोकसेवेत परतणार
पुणेकरांना आश्वस्त करताना मोहोळ म्हणाले की, शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि त्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत हजर होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


