LPG Gas Shortage Rumors: “देशात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसून, काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करत आहे,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भद्रावती येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण रांगा लावून संभ्रमात पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ऑनलाइन बुकिंगद्वारे गॅस वेळेत उपलब्ध होत असतानाही लोकांमध्ये अराजकता निर्माण करणे ही काँग्रेसची विघातक बुद्धी असल्याचे त्यांनी नमूद केले.
विदर्भात ‘ग्रीन स्टील’ची क्रांती; १० हजार जणांना रोजगार
विदर्भाच्या औद्योगिक विकासावर भाष्य करताना फडणवीस यांनी भद्रावती येथील आगामी प्रकल्पांची महत्त्वपूर्ण माहिती दिली. या भागात दोन मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ३०,००० कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक होणार असून, यामुळे सुमारे १०,००० तरुणांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, ‘कोल गॅसिफिकेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करून येथे ‘ग्रीन स्टील’ बनवले जाईल. पर्यावरणपूरक पद्धतीने तयार होणाऱ्या या स्टीलला जागतिक स्तरावर मोठी मागणी असून, भारताला या क्षेत्रात जागतिक केंद्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी विदर्भाचे पाऊल
भद्रावती येथे उभारला जाणारा हा प्रकल्प देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्लांट ठरणार असून त्याचा पहिला टप्पा पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या कार्बन कॅप्चरिंग आणि आवश्यक केमिकल्ससाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, या प्रकल्पामुळे हे सर्व घटक आता भारतातच तयार होतील, ज्यामुळे परकीय चलनाची बचत होईल. देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी विदर्भाचे हे योगदान मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.


