Phaltan Crime: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणतेही बाह्य आघाताचे किंवा जखमेचे चिन्ह नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, मृत्यूचे कारण गळफास असल्याची पुष्टी झाली आहे.
शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष
शवविच्छेदन अहवालात महिला डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढल्या नाहीत. तथापी, महिलेचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जबरदस्ती किंवा संघर्षाचे कोणतेही संकेत नाहीत. रुग्णालय प्रशासनाने हा अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केला असून, तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
सीडीआर अहवालातून नवीन माहिती
तपासादरम्यान मृत डॉक्टरचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) पोलिसांच्या ताब्यात आला आहे. या रेकॉर्डनुसार, डॉक्टरचा संपर्क प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्याशी वारंवार झाला होता. आत्महत्येच्या काही वेळ आधीही बदनेसोबत संवाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गोपाल बदने आणि डॉक्टरमध्ये केवळ मैत्रीचे संबंध होते असा दावा तपासात समोर आला आहे. तथापी, मृत डॉक्टरच्या हस्ताक्षराच्या पडताळणीसाठी पाठवलेला फॉरेन्सिक अहवाल अद्याप पोलिसांकडे आलेला नाही.
हेही वाचा – फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; हॉटेच्या रूममधलं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
आरोपी PSI गोपाल बदनेचा मोबाईल अजूनही गायब
या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदने याच्याबाबत रोज नवे खुलासे होत आहेत. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बदनेवर अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, बदनेने आत्मसमर्पण करण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला आहे. हा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यात महत्त्वाचे डिजिटल पुरावे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
हातावर आढळली सुसाईड नोट
घटनास्थळी डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट सापडली होती. त्यामध्ये डॉक्टरने PSI गोपाल बदनेने चार वेळा बलात्कार केला, तसेच प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला असे स्पष्टपणे नमूद केले आहे. ही नोट सध्या फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.


