अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकांपासून तापलं आहे. या तणावपूर्ण वातावरणात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोराने सर्वांसमक्ष आमदार खताळ यांच्या कानशिलात लगावली. यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
ही घटना संगमनेरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडली. यावेळी हल्लेखोराने आमदार अमोल खताळ यांच्यावर अचानक हल्ला केला आणि त्यांच्या कानशिलात मारली. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली, तर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. सध्या शहरात तणावाचं वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या हल्ल्याचा तीव्र निषेध करत अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. “हा भ्याड हल्ला कुणाच्या सांगण्यावरून झाला? यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा तपास करा,” असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. विखे पाटील यांनी राजकीय विरोधकांना थेट इशारा देत म्हटलं, “काही लोकांना लोकशाही मान्य नसेल आणि ठोकशाहीचं समर्थन असेल, तर महायुतीचे कार्यकर्तेही त्याच भाषेत उत्तर देतील. हल्लेखोरांच्या मागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
उपमुख्यमंत्र्यांकडून अमोल खताळ यांचं कौतुक
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमधील जाहीर सभेत आमदार अमोल खताळ यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर घडलेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा हल्ला राजकीय सूडबुद्धीतून झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. विखे पाटील यांनीही हल्ल्यामागील हेतू आणि संभाव्य पुरस्कर्त्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. “हल्ल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होणार नाही. जो कोणी यामागे असेल, त्याला वेळेत धडा शिकवला जाईल,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.


