नाशिक: पाण्याच्या शोधात घराजवळ आलेल्या एका श्वानाने आपली तहान भागवण्यासाठी हंड्यात तोंड टाकले. मात्र यावेळी त्याची मान हंड्यात अडकल्यामुळे श्वान बिथरला आणि सैरभैर झाला. पहाटेच्या वेळी भांड्याचा खडखडाट ऐकायला आल्याने घरमालक व शेजारी पळतच घराबाहेर आले. त्यांनी अग्निशमन दलास पाचारण केले. दलाच्या पथकाने हंड्याचा पत्रा कापून त्याची सुटका केली.
शहरातील टाकळी गावात हा प्रकार घडला. पहाटे ३.३० च्या सुमारास पाळीव श्वानाने पाणी पिण्यासाठी हंड्यात डोके घातले आणि त्याला या विचित्र संकटाला सामोरे जावे लागले. प्रयत्न करूनही अडकलेली मान निघेना. काही दिसत नसल्याने श्वान सैरावैरा पळू लागला. आसपासच्या श्वानांनी भुंकून नागरिकांना जागे केले. या घटनेची अग्निशमन दलास माहिती देण्यात आली. दलाचे जवान काही मिनिटांत दाखल झाले. हंड्यात मान अडकलेल्या श्वानाची अवस्था पाहून तेही हबकले. इतर श्वान भुंकत असल्याने तिथे मदतकार्य करणे शक्य नव्हते.
त्यामुळे पथकाने तातडीने श्वानाला अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आणले. तेथे विशिष्ट पद्धतीच्या कटरने हंड्याचा पत्रा कापण्यात आला. अर्धा ते पाऊण तासानंतर श्वानाची सुखरूप सुटका करण्यात करण्यात आली. तहानलेल्या श्वानास पाणी पाजत पुन्हा टाकळी गावात मूळ निवासी भागात सोडण्यात आल्याची माहिती प्रभारी केंद्रप्रमुख के. टी. पाटील यांनी दिली. पाटील यांच्यासह चालक देटके, सांत्रस, फायरमन सोमनाथ थोरात, व्ही. पी. शिंदे, दिनेश लासुरे, इसार शेख, गौरव पाटील, शिवम मोरे, प्रफुल्ल गायकवाड, अभिषेक बोराडे या जवानांनी बचाव मोहीम पार पाडली.


