जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडे गावात शेतातील तारेच्या कुंपणात विजेचा प्रवाह सोडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश असून, या कुटुंबातील दीड वर्षीय चिमुरडी सुदैवाने बचावली आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, बांधकाम आणि शेतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले पावरा कुटुंब मजुरीसाठी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात स्थलांतरित झाले होते. बुधवारी (20 ऑगस्ट) सकाळी हे कुटुंब वरखेडे शिवारातील एका शेतात मजुरीच्या शोधात गेले असता, शेताच्या तारेच्या कुंपणाला त्यांचा स्पर्श झाला.
शेतमालकाने वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी या कुंपणात बेकायदेशीररित्या विजेचा प्रवाह सोडला होता. या उच्च-व्होल्टेज तारेच्या संपर्कात आल्याने विकास रामलाल पावरा (वय 35), सुमन विकास पावरा (वय 30), त्यांचे दोन मुलगे पवन आणि कंवल, तसेच विकास यांची सासू यांचा जागीच मृत्यू झाला. या कुटुंबातील दीड वर्षीय मुलगी दुर्गा विकास पावरा ही चमत्कारिकरित्या बचावली.
एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, शेतमालकाने वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी बेकायदेशीररित्या विजेचा प्रवाह सोडला होता. याशिवाय, या शेतात दोन रानडुक्करांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतमालकाने मजुरांना विजेच्या प्रवाहाची कोणतीही माहिती दिली नाही, यामुळे ही दुर्घटना घडली, असं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.


