शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गणेशनगर-गांजेवाडी परिसरात बुधवारी सकाळी एका शेतकऱ्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. फाकटे (ता. शिरूर) येथील रहिवासी देवराम नानाभाऊ टेके (वय 50) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला असून, त्यांच्या डोक्याला आणि मानेजवळ गंभीर जखमा आढळल्या आहेत. पोलिसांना या प्रकरणात खुनाचा संशय असून, तपासाला सुरुवात झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवराम टेके मंगळवारी (19 ऑगस्ट) सकाळी 9 वाजता घराबाहेर पडले होते. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9:45 पर्यंत त्यांचा फोन सुरू होता, परंतु त्यानंतर तो बंद झाला. दिवसभर ते घरी परतले नाहीत आणि त्यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. यामुळे कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला.
फाकटे येथील एका युवकाने टेके यांना मंगळवारी गणेशनगर-गांजेवाडी रस्त्याने जाताना पाहिल्याचे सांगितले. बुधवारी सकाळी नातेवाइकांनी या रस्त्यावर शोध घेतला असता, कवठे येमाई येथील गांजेवाडी रस्त्यावरील एका पोल्ट्रीशेजारी टेके यांची दुचाकी आढळली. या दुचाकीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर ऊसाच्या शेताच्या कडेला त्यांचा मृतदेह सापडला.
मृतदेहाच्या डोक्याला आणि मानेजवळ गंभीर जखमा असल्याने पोलिसांनी प्राथमिक तपासात खुनाचा संशय व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
घटनेची माहिती मिळताच शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कारंडे आणि पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, स्थानिकांची चौकशी आणि संशयितांचा शोध सुरू केला आहे.


