यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे उड्डाणपूल बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पावसाच्या पाण्यात बुडून चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. 10 ते 14 वयोगटातील या मुलांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, बांधकाम स्थळावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रीहान असलम खान (वय 13 वर्षे), गोलु पांडुरंग नारनवरे (वय 10 वर्षे), सोम्या सतीश खडसन (वय 10 वर्षे), वैभव आशीष बोधले (वय 14 वर्षे) अशी खड्यात पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांनी नावे आहेत.
ही चारही मुले दारव्हा शहरातील रहिवासी होती. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल बांधकामासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात ही मुले बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूल बांधकामाचे काम गेल्या काही काळापासून सुरू आहे. या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सायंकाळी ही चार मुले खड्ड्याजवळ खेळत असताना किंवा अन्य कारणाने पाण्यात पडली.
स्थानिकांनी तातडीने धाव घेत मुलांना पाण्यातून बाहेर काढले आणि प्राथमिक उपचारांसाठी यवतमाळ येथील रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी चारही मुलांना मृत घोषित केले. दारव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.


