अहिल्यानगर (राहुरी तालुका) : अहिल्यानगर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका दूरच्या नातेवाईकाने एकाच कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे, चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मोठ्या बहिणीलाही या नराधमाने सोडले नाही.
आई-वडील विभक्त झाल्याने या मुलींचा सांभाळ या नातेवाईकाकडे सोपवला होता, पण त्याने त्यांचे रक्षण करण्याऐवजी भक्षक बनून शोषण केले. या प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांच्या धाडसामुळे झाला असून, राहुरी पोलिसांनी आरोपी दांपत्याला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चौघी पीडित बहिणी नाशिक जिल्ह्यातील असून, त्यापैकी एक मुलगी सज्ञान आहे, तर इतर तिघी अनुक्रमे १६, १४ आणि १० वर्षांच्या अल्पवयीन आहेत. सज्ञान मुलीचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती नुकतीच बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आली असता, आरोपीने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. या पीडितेच्या धैर्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला आणि दोघांनी तात्काळ स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला.
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणला, ज्यामुळे पोलिसांनी वेगाने कारवाई करत चारही बहिणींची सुटका केली आणि आरोपीसह त्याच्या पत्नीलाही अटक केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगेंनी या कारवाईची माहिती देताना सांगितले की, आरोपीने अल्पवयीन बहिणींवरही अनेक वेळा अत्याचार केले.
या चारही मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी आरोपीकडे होती, पण त्याने त्यांच्यावर दीर्घकाळ शारीरिक व मानसिक अत्याचार केले. तपासात हे स्पष्ट झाले की, आरोपीने केवळ मोठ्या बहिणीवरच नव्हे, तर तिच्या अल्पवयीन बहिणींवरही अनेकदा हा गुन्हा केला. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सामाजिक कार्यकर्ते व नेते यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
राहुरी पोलिसांनी या प्रकरणात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपी दांपत्याला न्यायालयात हजर केले जाईल. पुढील तपास सुरू असून, पीडित बहिणींना मानसिक व शारीरिक आधार देण्यासाठी संस्था व पोलिस मदत करत आहेत.


