नाशिक: राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास तसेच 50 हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 1995 मध्ये कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 1995 ते 1997 च्या दरम्यानचे हे प्रकरण आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यासह शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळी आमचे उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरे घर नाही , अशा स्वरूपाची माहिती कोकाटे यांनी दिलेली होती. त्यांना सदनिका या शासनाच्या माध्यमातून मिळाल्या होत्या. परंतु, त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती.
1995 मध्ये कागदपत्रांची फेरफारकरवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याप्रकरणी एक याचिका दाखल केली होती. तसेच याबाबतचा गुन्हा नाशिकमधील सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी 1997 पासून सुरु होती आणि आज (दि. २०) या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार जणांना आरोपी करण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह आणखी दोन जणांचा समावेश होता. मात्र, कोकाटे बंधू यांच्यासोबत आरोपी असलेल्या इतर दोन जणांबाबत कोर्टाने कोणत्याही शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मंत्रिपदासह आमदारकीही जाणार?
दरम्यान, न्यायालयाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द करण्यात येते. त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदासह आमदारकी गमवावी लागू शकते. जर कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली, तर त्यांची राजकीय कारकीर्द संकटात सापडू शकते. त्यामुळे कोकाटे उच्च न्यायालयात धाव घेऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याच्या घडीला कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर अजित पवार गटाच्या दुसर्या नेत्याच्या मंत्रिपदावर संकट ओढावले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कसा मार्ग काढणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


