पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी भरधाव बस कंटेनरवर आदळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसचालकासह दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आले आहे. तसेच बसचालकाविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सदानंद महादेव खोत (वय ३०, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्वतेज अभिमन्यू जाधव (वय २३, रा. हडपसर) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी एक खाजगी बस मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. सदर बस भुळवाडी परिसरात आली असता चालक खोत याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि टी कंटेनरवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये बसचालक खोत याच्यासह दहा प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जखमी चालकासह प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीस हवालदार पी. एन. कांबळे पुढील तपास करत आहेत.


