राजगुरुनगर: निमगाव खंडोबा येथे बिबट्याने साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला. सुदैवाने चिमुकला बचावला. मात्र, या हल्ल्यात मुलगा आणि त्याची आई जखमी झाली. हल्ल्यातील जखमी चिमुकल्याचे नाव देवांश गव्हाणे आहे. निमगाव येथील भगतवस्ती येथे मंगळवारी 25 तारखेला रात्री 8 वाजता हा हल्ला झाला. देवांश घराबाहेर खेळत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
हल्ल्यात बिबट्याने त्याच्या मानेला पकडले आणि मानेला धरून शंभर फुट फरफटत नेले. बिबट्याने दात त्याच्या मानेला लागले. घराबाहेर आरडोओरडा एकताच देवांशची आई बाहेर आली आणि जोरजोराने ओरडायला करू लागली. तिच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला आणि तो पळून गेला.
बिबट्यासोबतच्या झटापटीत मानेला बिबट्याचे दात लागून जखम झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून निमगाव, दावडी, रेटवडी या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घरातून कोंबड्या, कुत्रे, बकऱ्या फस्त झाल्या आहेत. या परिसरात दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
बिबट्याची संख्येत अचानक वाढ
पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, जेजुरी, पुरंदर भागातून बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात बाठले आहेत. खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, जेजुरी, पुरंदर भागात ऊसाची शेती सर्वाधिक आहे. त्याशिवाय, याठिकाणी सध्या ऊसतोड सुरु आहे. त्यामुळे ऊसाच्या शेतात लपून बसलेले बिबटे बाहेर पडू लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी बिबट्याची पिल्लेही आढळून आली आहेत. परंतु दरवर्षी पेक्षा यंदा बिबट्याच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ही वाढ कशामुळे झाली? याबाबत कोणाकडेही उत्तर नाही. प्रशासनाकडून आता बिबटयांना रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. प्रशासनाकडून या तालुक्यांना पिंजरे पुरवले जात आहेत. वनविभागाचे अधिकारीही या भागात तैनात आहे. परंतु बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.


