Winter Alert : वर्षाच्या अखेरच्या दिवशी (३१ डिसेंबर २०२५) राज्यात गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहील, मात्र उद्यापासून (१ जानेवारी २०२६) किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होऊन थंडीचा कडाका वाढणार आहे. पहाटे धुके आणि दवाचे वातावरण कायम राहील.
राज्यातील नीचांकी तापमान
– परभणी : ६.३ अंश सेल्सिअस
– धुळे : ६.६ अंश सेल्सिअस
– निफाड (नाशिक) : ६.८ अंश सेल्सिअस
– अहमदनगर, जेऊर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ : ९ अंश सेल्सिअस
– पुणे, नाशिक, अमरावती, भंडारा, गडचिरोली: १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी
निफाड, धुळे आणि परभणीमध्ये सातत्याने थंडीचा जोर कायम आहे. उर्वरित भागातही किमान तापमानात घट नोंदवली गेली. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळांवर नागरिकांची तुफान गर्दी असून, शेकोट्या पेटवून थंडीचा आनंद घेतला जात आहे. मात्र, वाढत्या थंडीमुळे काढणीला आलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
पुढील काही दिवस थंडी टिकून राहणार असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान आणखी खाली येईल. नागरिकांनी गरम कपडे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


