Tamhini Ghat Murder: ताम्हिणी घाटात अज्ञात तरूणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी हल्ला झाला आहे. त्यानंतर मृतदेह ताम्हिणी घाटातील आडमार्गाला फेकून देण्यात आला. मृत तरुणाच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याने अत्यंत वाईट प्रकारे तरूणावर हल्ला झाल्याचे पोलीसांकून सांगण्यात येत आहे. माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हत्येच्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम बोलवण्यात आली आहे.
मृताचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे
ही संपूर्ण घटना स्थानिकांनी पाहताच त्यांनी पोलिसांना बोलावले. मृताचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असल्याचा अंदाज आहेे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह इथं टाकून देण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. ताम्हिणी घाटातील स्थानिक ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांना परिसरातील जमीन दाखवण्यासाठी जंगलाच्या भागातील एका आडमार्गावरती गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आला.
मृतदेहावर धारदार शस्त्राने वार
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने माहिती देण्यात आली, त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली, त्यावेळी तरूणाच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. आरोपींनी तरुणाची हत्या दुसऱ्या ठिकाणी करून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह ताम्हिणी घाटात टाकला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत तरूणाची ओळख अद्याप पटलेली नाही.
पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून, मृताची ओळख पटवण्यासाठी पुणे आणि रायगड जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे ताम्हिणी घाट परिसरात पर्यटकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


