पुणे: नव्याने तयार करण्यात आलेल्या फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेच्या विकासासाठी आणि पुणे मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. समाविष्ट २३ गावातील थकीत कराची वसूली करण्यासाठी तातडीने अभय योजना राबवावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
पुणे महापालिका हददीतील गावांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. याप्रसंगी आमदार विजय शिवतारे, खासदार मेधा कुलकर्णी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी आंबेगाव बुद्रुक येथील कचरा डेपोमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरीक हैराण झाले आहेत, त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी या कचरा डेपोचे अभ्यासपूर्ण नियोजन करून त्यानंतरच कचऱ्याची व्हिल्हेवाट लावावी. गांडूळ प्रकल्प राबवून, खड्डा तयार करून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावावी असे सांगितले. तसेच या कचरा डेपोची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्याऱ्यांना दिले.
महापालिका हद्दीतील ६५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या जांभूळवाडी तलावाच्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून ते आंबेगाव खुर्द आणि बुद्रुक तसेच मांगडेवाडी, भिलारेवाडी, कोळीवाडे, गुजर निंबाळकरवाडी आणि इतर काही गावांना देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी या पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता तपासून त्यानंतर त्यांचा पिण्यासाठी वापर करण्याची प्रकिया सुरू करावी असे निर्देश शिंदे यांनी दिले. पुणे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांना आलेला वाढीव कर वसूल करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार या गावांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुणे मनपाने तातडीने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश पालिका आयुक्तांना दिले.
६२६ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करा
पालिकेत २३ गावांचा मनपा हद्दीत समावेश करून घेताना तेथील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या तब्बल ६२६ कर्मचाऱ्यांना आकृतिबंधाच्या तांत्रिक अडचणीमुळे सेवेतून कमी करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना पुन्हा पालिका सेवेत समाविष्ट करण्यासाठी त्यांची सद्यस्थिती तपासून प्राधान्याने सेवेत समाविष्ट करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.


