मुंबई: महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात धुसफूस सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थ खात्याचे मंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडून आपल्या खात्याला कमी निधी मिळत असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीतच अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे शिवसेना मंत्र्यांना आदेश दिले आहेत. परंतु, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा पलटवार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अर्थमंत्री अजित पवार हे निधी वाटपात शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देत नसल्याची तक्रार शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यानंतर आपल्या मंत्र्यांचा संताप पाहून शिंदे यांनी अजित पवारांच्या खात्यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली होती. मात्र, आता पवार यांच्या अखत्यारीत येत असलेल्या खात्याने थेट शिंदे यांच्या खात्याला रडारवर आणले आहे.
पवार यांच्या खात्याने थेट एकनाथ शिंदे यांच्या खात्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची भूमिका मांडली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाल्या असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्य सरकारने शक्तिपीठ मार्गासाठी सुमारे 20,787 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. यासाठी ‘हुडको’कडून उचलण्यात येणाऱ्या महागड्या कर्जावर दोन टक्के अधिक व्याज लागू आहे. वित्त विभागाने याला “आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य” असं स्पष्ट मत दिले होते. त्यानंतरही सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच संबंधित महामंडळाच्या कामकाजावर यापूर्वीही अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे आर्थिक देणी झपाट्याने वाढत असल्याबद्दल नियोजन विभागाने नुकतीच चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे पवार यांच्या विभागाकडून महामंडळाच्या आर्थिक शिस्तीवर लक्ष ठेवण्याचा तसेच खात्याची स्वतंत्र पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅगकडून रस्ते विकास महामंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले होते. त्याचबरोबर, महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थापनाचे स्वतंत्रपणे परीक्षण आणि पडताळणी करण्याची सूचना नियोजन विभागाने केली असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने नुकतेच दिले आहे.
दरम्यान निधीच्या वाटपावरून शिवसेनेचे मंत्री यापूर्वीही नाराज असल्याची पार्श्वभूमी असताना, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खात्यावर थेट प्रश्न उपस्थित केल्याने अजित पवार यांनी शिंदे यांच्यावर पलटवार केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.


