मुंबई: सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये सध्या काही सगळं आलबेल नसल्याचे चित्र आहे. अजित पवारांचे पक्षातील जुने सहकारी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु सुरू आहे. तर, दुसरीकडे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी बोलावूनही आमदार जगताप यांनी बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे संग्राम जगताप यांचे नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचा पुनरुच्चार करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षातील एका आमदाराच्या वादग्रस्त कृतीमुळे त्याच्या डोक्याला ताप वाढला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यामुळे आता पक्षांतर्गत नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २४) पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियमित बैठकीला आमदार संग्राम जगताप अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीबाबत पवार यांनी बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित आमदारांसमोर जगताप यांनी केलेल्या विधानांवरही नाराजी व्यक्त करत, अशा कृती पक्ष सहन करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. अशा पक्षात राहून जर कोणी आमदार धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणारी किंवा आक्षेपार्ह विधाने करत असेल, तर ती पक्षाच्या धोरणाविरोधात गोष्ट असल्याचे पवारांनी म्हटले. पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम करणाऱ्या अशा विधानांबाबत पवार स्वतः आमदार जगताप यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थित आमदारांना दिली.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून आमदार संग्राम जगताप यांच्याकडून अल्पसंख्याक समुदायाबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचे दिसून येत आहे. संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर भाषणात केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.


