नवी दिल्ली: देशात सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देणारी महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून अखेर गुरुवारपासून बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयामुळे नेटकऱ्यांनी जल्लोष केला असून विविध प्रकारचे मिम समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
अनेक महिन्यांपासून ही कॉलर ट्यून मोबाईलवरकॉल लागण्याच्या आधी कॉल करणाऱ्यांना सक्तीने ऐकवली जात होती. या ट्यूनविरुद्ध लोकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. महानायक अमिताभ बच्चन यांनाही यामुळे ट्रोल व्हावे लागले होते. सायबर सुरक्षा जागरण मोहीम संपल्यामुळे ही ट्यून बंद करण्यात येत आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. ही ट्यून बंद केली जात असल्याचे वृत्त येताच समाज माध्यमांवर निम्सचा पाऊस पडला.


