पुणे: मुंबईला गेल्यावर ज्याक्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होईल, त्याच वेळी आपण त्यांना ‘तुम्ही एक पुस्तक लिहिले आहे, आता तुम्ही दुसरे पुस्तक लिहा आणि त्याचे नाव ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे द्या, असा सल्ला देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी हे विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा’ असे विरोधी पक्षनेते असताना एक पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे त्यांना पुस्तक लिखाणाचा अनुभव आहे. त्यामुळे आपण आता त्यांना विनंती करणार आहे की, तुम्ही दुसरे पुस्तक लिहा, त्याचे नाव द्या ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.’ राज्याला राजकारणाचा सुसंस्कृतपणा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे लाभला आहे, असेही पवार म्हणाले.
माझी जबाबदारी वाढल्यामुळे आता पीडीसीसी बँकेकडे लक्ष देता येत नाही म्हणून मी संचालक पदाचा राजीनामा दिला. पीडीसीसी बँकेला जागा कमी पडत होती. परवा ५८ कोटी रुपये देऊन समोरची पारशी माणसाची एक जागा विकत घेतली आहे. आता बँकेचे बांधकाम सुरू करू. पीडीसीसी बँकेचे काम चांगले सुरू आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
१९९१ साली पहिल्यांदा मी निवडणूक लढवली. त्यावेळेस भाषणाची भीती वाटायची, फॉर्म भरला आणि दगडूशेठ गणपतीला नारळ फोडून भाषण करायची वेळ आली. मला काहीच बोलता येत नव्हते. प्रतिभा काकी कुठेतरी लांब थांबून ऐकत होती. मग म्हटले की, जे व्हायचे ते होईल मग भाषणाला उठलो, अशी आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली.
महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही मोठी रॅली काढणार आहोत, मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाजवळ आम्ही जमणार आहोत, सहाभागातून पाणी आणि माती कार्यकर्त्यांना आणायला सांगितली आहे. त्यादिवशी मुंबईत सभा घेणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.


