पुणे: सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ठराविक कालावधी
लागणार असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मानहानीचा खटला शुक्रवारी (दि. २५) तहकूब करण्यात आला. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या ९ मे रोजी होणार आहे.
काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी पुण्याच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ठराविक कालावधी लागणार आहे. तोपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात यावी, असा अर्ज राहुल गांधी यांच्या वकिलांनी शुक्रवारी केला. न्यायालयाने तो मंजूर करून पुढील सुनावणी ९ मे रोजी करण्याचा आदेश दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी एमपीएमएलए विशेष न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. खटला दाखल करताना सावरकर यांनी लिहिलेले ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक तसेच एक पेन ड्राईव्ह व काही वर्तमानपत्रांची कात्रणं न्यायालयात दाखल केली. मात्र, या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला मिळाल्या नाहीत.
ही सर्व कागदपत्रे व माझी जन्मठेप हे पुस्तक बचाव पक्षाला देण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, असा अर्ज राहुल गांधी यांच्यातर्फे वकिलांनी गेल्या सुनावणीदरम्यान केला होता. त्यानुसार फिर्यादी यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, पेन ड्राईव्ह व ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक अॅड. पवार यांना द्यावेत, असा आदेश विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी दिला होता. त्याबाबत, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत फिर्यादी सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी गांधी यांच्या वकिलांकडे ही कागदपत्रे सुपूर्द केली.
या कागदपत्रांची सत्यता व पडताळणी केल्याशिवाय खटला पुढे जाऊ शकणार नाही. कारण सर्व कागदपत्रे व पुस्तक वाचल्यानंतर त्यातली सत्यता स्पष्ट झाल्यानंतर खटल्याची सुनावणी नियमित घेता येईल. या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास याला ठराविक कालावधी लागणार आहे, तोपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात यावी, असा अर्ज गांधी यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. तो मंजूर करण्यात आला.


