Ajit Pawar: ‘पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही. ते दोघे कमी पडले. अजित गव्हाणे यांनी निवडणूक न लढवता मैदानाच्या बाहेर राहिल्याने चुकीचा संदेश गेला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विरोधात बोलणे टाळले. आता तरी तोंड उघडावीत. चुकीच्या कामाला आक्रमकपणे विरोध करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला.
महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वतः उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली. महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य केले. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले. केवळ ३७ नगरसेवक निवडून आले. पवार यांनी साेमवारी नवनिर्वाचित ३७ नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन केले. निवडणुकीचा आढावा घेतला. पक्षाचा पराभव का झाला, यावर सविस्तर चर्चा केली. नगरसेवकांना पवार यांनी मार्गदर्शन केले.
पवार म्हणाले, ‘महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आजी-माजी आमदारांनी उमेदवारांचा प्रचार केला नाही. अजित गव्हाणे यांनी निवडणूक न लढता मैदानाच्या बाहेर राहणे चुकीचे होते. त्यामुळे चुकीचा संदेश गेला. दोन उमेदवारांनी पत्नीला निवडणुकीसाठी उभे न करता कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे होती. त्यामुळे प्रभागातील इतर भागातील मते मिळाली असती. स्थानिक पदाधिकारी चुकीच्या कारभाराविराेधात काहीच बाेलले नाहीत. इतर उमेदवारांच्या प्रचारात दिसले नाहीत. प्रत्येकाने जबाबदारी घेतली असती तर सत्तेपर्यंत जाता आले असते. आता तरी तोंड उघडावे. चुकीच्या कामाविराेधात बाेलावे. चुकीच्या कामांना प्रखरपणे विरोध करावा.’
विराेधी पक्षनेते पदासाठी आक्रमक चेहरा
राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता महापालिकेचा विरोधी पक्षनेता असणार आहे. या पदासाठी प्रभाग क्रमांक २० मधील चारही नगरसेवक निवडून आणणारे पॅनेल प्रमुख संदीप वाघेरे यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भाेईर, माजी महापौर वैशाली घोडेकर इच्छुक आहेत. चुकीच्या कामाविरोधात बाोलणारा आणि आक्रमक चेहरा विरोधी पक्षनेते पदासाठी देणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
काही पदाधिकाऱ्यांनी प्रचार न केल्यामुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. चुकीच्या कामाला विराेध करावा. त्याविराेधात आवाज उठविण्याचे आदेश दिले आहेत. गट नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच गटनेता निवडला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष याेगेश बहल यांनी सांगितले.


