राजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत मजेशीर प्रसंग घडला. व्यासपीठावरून एका उत्साही कार्यकर्त्याने अजित पवारांना “राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार…” असं संबोधलं, की लगेच सभागृहात एकच हशा पिकला.
अजित दादांनी माइक घेऊन तत्काळ विनोदी पद्धतीने सुधारला, “अरे बाबा, मला उपमुख्यमंत्री म्हणा… मुख्यमंत्री नाही,” हा टोला ऐकून सभागृहात बसलेले नागरिक हसून बेहाल झाले.
प्रशासन मला टरकून राहतं
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “मी कामाचा माणूस आहे, प्रशासनावर माझी पकड आहे. पण काही लोक ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात. एक रुपयाचाही मिंदा मी घेतला नाही. दाखवा ना कोणी माझ्याकडून पैसे घेतले की मी कुणाला चिरीमिरी दिली. उलट प्रशासन मला टरकून राहतं, कामं करायला मी त्यांना सांगतो तेही,” असं अजित पवार म्हणाले.
हिवाळी अधिवेशनात “प्रश्न” मार्गी लावणार
आचारसंहितेच्या बंधनातही दादांनी आपली खास शैली कायम ठेवली. ते म्हणाले, “आता आचारसंहिता आहे म्हणून स्पष्ट बोलू शकत नाही. पण येत्या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. किती निधी लागेल, काय करायला हवं ते पाहतो. तुम्ही माझी विनंती ऐकली तर मी तुमची विनंती ऐकतो… नाहीतर परत म्हणाल ‘दादांनी दम दिला’”, हे ऐकून उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिक पुन्हा एकदा हसले, टाळ्यांचा कडकडाट झाला.


