Winter Session 2025: लोकसभा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट संदेश दिला आहे. ‘पराभवाची निराशा झटकून द्या आणि धोरणाधारित चर्चा करा,’ असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. संसद भवनात माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी सांगितले की, हे अधिवेशन देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी आहे, नकारात्मक भावना व्यक्त करण्यासाठी नाही.
येथे नाटक नाही, तर धोरणांवर चर्चा व्हावी
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ज्याला नाटक करायचे आहे तो ते करू शकतो. पण येथे नाटक, घोषणा किंवा गदारोळासाठी मैदान नाही. धोरणांवर, मुद्द्यांवर आणि देशाच्या प्रगतीवर भर दिला पाहिजे.’ त्यांनी अधिवेशनाच्या उद्दिष्टांवर भर देत सांगितले की संसद देशाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेते, त्यामुळे प्रत्येक पक्षाने सकारात्मक आणि विषयाधारित भूमिका मांडावी.
हेही वाचा – पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण थेट दिल्लीत पोहचले, काँग्रेस खासदाराचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
लोकशाही आणि अर्थव्यवस्था भारताची दुहेरी ताकद
हिवाळी अधिवेशनाआधीच्या संबोधनात मोदी म्हणाले की, भारत जगासमोर लोकशाहीचे आदर्श उदाहरण ठरत आहे. बिहार निवडणुकीतील मतदारांची उपस्थिती ही लोकशाहीची शक्ती दर्शवते. एकीकडे आपली लोकशाही मजबूत होत आहे आणि दुसरीकडे अर्थव्यवस्था नव्या उंचीवर पोहोचत आहे. जगाचे लक्ष भारताकडे आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी भारताचा वेगाने वाढणारा आर्थिक विकास ‘विकसित भारत’ या उद्दिष्टाकडे नेणारा निर्णायक टप्पा असल्याचेही स्पष्ट केले.
विरोधी पक्षांनी जबाबदारी पार पाडावी
विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करताना मोदी म्हणाले की काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत आणि त्याची निराशा ते सभागृहात व्यक्त करतात. हिवाळी अधिवेशन हे पराभवाचे रणांगण बनू देऊ नका आणि विजयाचा अहंकारही दाखवू नका. लोकप्रतिनिधी म्हणून आपण मुद्दे मांडले पाहिजेत, असेही ते म्हणाले. तथापी, सभागृहातील तरुण खासदारांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, पहिल्यांदा निवडून आलेले किंवा तरुण खासदार खूप उत्साही आहेत. परंतु त्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जात नाही. पक्ष कोणताही असो, नवीन पिढीला मंच मिळायला हवा. त्यांच्या अनुभवांमुळे सभागृहाचे काम अधिक समृद्ध होईल.


