इंदापूर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार, (दि.२८) रोजी उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सेक्रेटरी प्रा.लक्ष्मीकांत लाकाळ यांचीही उपस्थिती लाभली. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकारिणीचा आढावाही घेण्यात आला.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचा संवाद साधला ते म्हणाले की, “माजी विद्यार्थ्यांना माजी न म्हणता माझे विद्यार्थी म्हटले पाहिजे,” असे सांगत त्यांनी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमधील नाते कायम जिवंत व घट्ट राहते, असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विद्यार्थी प्रतिनिधी पल्लवी कवडे व सुदर्शन वेदपाठक यांनी माजी विद्यार्थ्यांचे अनुभव सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच श्याम काळे, चेतन यादव व पिसाळ यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला आणि विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थी संघटनेचे सेक्रेटरी प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या मेळाव्यामुळे माजी व सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद, स्नेह आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी दिसून आले.


