Shashikant Shinde : राज्यातील आगामी १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही माहिती दिली. हा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, भविष्यातील निवडणुकांबाबत दोन्ही पक्ष एकत्र येणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. शशिकांत शिंदे यांनी आज या चर्चांना पूर्णविराम दिला.
शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवण्याबाबत शरद पवारांशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष संयुक्तपणे निवडणुकीच्या मैदानात उतरतील. ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ आणि सक्षम उमेदवार असतील, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निकालांबाबत बोलताना शशिकांत शिंदे यांनी, “जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारतो,” असे सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी जर दोन्ही राष्ट्रवादींची युती आधीच झाली असती आणि शेवटच्या क्षणापर्यंत तिकीटवाटपाचा गोंधळ झाला नसता, तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते.


