Baramati byelection 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने माघार घेतली असली, तरी इतर २२ उमेदवारांनी मैदान सोडण्यास नकार दिल्याने लढत बहुरंगी झाली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी सुरुवातीला मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३० जणांनी माघार घेतली. काँग्रेसचे आकाश मोरे यांनीही माघार घेतल्याने सुनेत्रा पवारांसमोरचे एक मोठे आव्हान कमी झाले. धनगर समाजातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या उमेदवारीमुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती.
पवार कुटुंबासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून, अजित पवार यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
आता उरलेल्या उमेदवारांमध्ये अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे ही दोन नावे चर्चेत आहेत. मात्र, हे दोघेही बारामतीबाहेरील असल्याने त्यांचा प्रभाव कितपत पडेल, याबाबत साशंकता आहे.
एकूण २३ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी केवळ १० उमेदवार बारामतीतील आहेत, तर उर्वरित १३ उमेदवार बाहेरील भागांतील आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिकच नव्हे, तर बाहेरील उमेदवारांमुळेही चर्चेचा विषय ठरली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. आता या बहुकोनी लढतीत सुनेत्रा पवार मोठे मताधिक्य राखतात की एखादा उमेदवार आश्चर्याचा धक्का देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


