Maharashtra Weather Alert : राज्यात गेल्या काही दिवसांत पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात मोठा बदल झाला होता. मात्र आता पावसाने पूर्णपणे माघार घेतली असून उष्णतेचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. हवामान विभाग आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये ११ आणि १२ एप्रिलदरम्यान हीटवेव्हचा प्रभाव जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
मध्य आणि पूर्व भारतात पडलेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी आता हवामान पुन्हा कोरडे होत आहे. स्कायमेटच्या माहितीनुसार, ११ एप्रिलच्या सुमारास आणखी एक वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय होणार आहे. मात्र, याचा परिणाम मुख्यतः उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतातील डोंगराळ भागापुरताच मर्यादित राहणार आहे.
दरम्यान, उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा वेग वाढणार असून विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये उष्णता अधिक वाढेल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातच मे महिन्यासारखा कडक उन्हाळा जाणवण्याची शक्यता असून तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.


