Rupali Patil Thombre: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठी घडामोड घडली आहे. अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत वाद आणि नाराजीमुळे चर्चेत असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांना अखेर पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्याच्या प्रभाग क्रमांक २६ मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, मंगळवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अजित पवारांच्या भेटीनंतर चक्र फिरली
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही तासांत रुपाली पाटील यांनी पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, ज्या वेळी त्या पवारांना भेटायला गेल्या, तेव्हा तिथे त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. या भेटीनंतरच रुपाली पाटलांना उमेदवारीचा हिरवा कंदील मिळाला. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही ‘रुपालीं’मधील संघर्ष टोकाला गेला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
हेही वाचा – PMC Election: पुण्यात खळबळ! कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला ‘या’ पक्षाकडून उमेदवारी
बंडाच्या चर्चा आणि पक्षाशी निष्ठा
रुपाली पाटील या पक्षावर नाराज असून त्या शिवसेना (शिंदे गट) किंवा अन्य पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. विशेषतः स्टार प्रचारक आणि प्रवक्त्यांच्या यादीतून त्यांचे नाव वगळल्यानंतर त्यांची पक्षातून गच्छंती अटळ मानली जात होती. मात्र, शेवटच्या क्षणी मिळालेल्या या उमेदवारीमुळे त्यांनी पक्षातील आपले स्थान कायम राखल्याचे सिद्ध झाले आहे. रुपाली पाटील या मूळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) आक्रमक नेत्या होत्या. मनसेकडून त्यांनी यापूर्वी नगरसेविका म्हणून महापालिकेत काम केले आहे. २०२१ मध्ये त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला होता.
पुण्यात आता ‘राष्ट्रवादी विरुद्ध महायुती’चा थरार
पुणे महानगरपालिका निवडणुकीत यंदा शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यात राजकीय समिकरणे बदलली आहेत. प्रभाग २६ मध्ये रुपाली पाटील यांच्या उमेदवारीमुळे आता या प्रभागातील लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.


