इंदापूर : “उजनी धरण उभारताना आमच्या पूर्वजांनी कवडीमोल भावाने जमिनी दिल्या. मात्र, आता याच जमिनी पर्यटनाच्या नावाखाली बड्या उद्योगपतींना देण्याचा कुटील डाव शासन आखत आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. वेळ पडल्यास रक्ताचे पाणी करू, पण आपल्या हक्काची जमीन कोणाच्याही घशात घालू देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा कालठण येथील जनआक्रोश मेळाव्यात घेण्यात आला.
शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध उजनी धरणग्रस्त व मच्छिमार बांधवांनी कालठण ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभा घेऊन लढा पुकारला. यावेळी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे सदस्य बंडूपंत ननवरे यांनी प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “जलसंपदा विभागाने धरणग्रस्त शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली असून काही ठिकाणी प्रत्यक्ष कारवाईलाही सुरुवात झाली आहे. या अन्यायाला रोखण्यासाठी येणाऱ्या काळात तीव्र संघर्ष करावा लागणार आहे.”
उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे ज्येष्ठ सदस्य अंकुश पाडुळे यांनी ऐतिहासिक संदर्भ देत सांगितले की, “स्वर्गीय खासदार शंकरराव (भाऊ) पाटील यांनी ज्याप्रमाणे उजनीवर संकट आले असताना स्वतः रस्त्यावर उतरून शासनाला नमते घ्यायला लावले होते, तोच वारसा आताच्या लोकप्रतिनिधींनी चालवण्याची गरज आहे. इंदापूर, माढा, करमाळा आणि दौंडच्या आमदारांनी आता धरणग्रस्तांच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट करावी.”
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष निलेश देवकर यांनी अधिक तीव्र शब्दांत सरकारवर हल्ला चढवला. “हे शासन शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही लेकराबाळांसह रस्त्यावर उतरू. वेळ आली तर प्राणाची आहुती देऊ, पण मागे हटणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी माजी पोलीस उपअधीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी कायदेशीर बाबी मांडताना सांगितले की, संपादीत केलेल्या पण पाण्यात न जाणाऱ्या आणि उन्हाळ्यात उघड्या पडणाऱ्या जमिनींवर उद्योगपतींचा डोळा आहे. जर आपण आता संघटित झालो नाही, तर या जमिनी आपल्या हातातून कायमच्या जातील.
या मेळाव्यात धरणग्रस्त शेतकरी अण्णासाहेब धोत्रे, सचिन जाधव, सुनील जाधव, काकासाहेब मांढरे आणि सचिन कोळेकर यांनी अत्यंत आक्रमकपणे मनोगत व्यक्त करत संभाव्य धोके मांडले व शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश शिंदे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अविनाश शिंदे यांनी केले. या मेळाव्याला कालठण व परिसरातील धरणग्रस्त व मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


