इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील बावडा व परिसरात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे नुकसान झालेल्या फळबागा व शेती पिकांची अंकिता पाटील ठाकरे यांनी शनिवारी (दि. 21) प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गुरुवारी (दि. 19) सायंकाळी इंदापूर तालुक्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसासह बावडा परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या अवस्थेत असलेली ही पिके गारांच्या तडाख्याने जमिनीवर आडवी झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
तसेच डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी या फळबागांनाही गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या डाळिंब व पेरू बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलगळ झाली आहे. द्राक्ष बागांमध्ये काढणीच्या टप्प्यावर असलेल्या घडांना तडे जाऊन मणी गळून पडले आहेत. याशिवाय कडवळ, मकवान यांसारखी चारा पिके वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर लोळल्याने पशुपालकांनाही फटका बसला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना अंकिता पाटील ठाकरे यांनी शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज व्यक्त केली. तसेच याबाबत दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात पंचायत समिती सदस्या धनश्री पाटील, सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजीत घोगरे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


