Pune Metro Phase 2: पुणेकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. सततची वाहतूक कोंडी आणि वाढता प्रवासाचा त्रास यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे मेट्रोच्या विस्तार योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेर मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. एकूण 9,880 कोटी रुपयांच्या फेज-2 प्रकल्पाला कॅबिनेटने हिरवा कंदील दिल्याने पुण्याचा विकास मार्ग अधिक वेगवान होणार आहे.
पुण्याला ‘अमृत महोत्सवा’ची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो फेज-2 ला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात लाईन-4 (खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला) व लाईन-4A (नळ स्टॉप–वारजे–माणिक बाग) या दोन नवीन मार्गांचा समावेश आहे.
हेही वाचा – पुणे पोलिसांची मोठी कारवाई! मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी 3 दिवसांत 178 वाहन चालकांवर कारवाई
नवीन मार्गांचे तपशील
या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 31.636 किमी असून, 28 उंच स्टेशनांची बांधणी करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारसोबत आंतरराष्ट्रीय वित्त संस्था देखील प्रकल्पात सहभागी होणार आहेत. प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. खराडी आयटी पार्क, हडपसरचा औद्योगिक पट्टा, स्वारगेट, वारजे व माणिक बाग यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांना या विस्ताराचा मोठा लाभ मिळणार आहे. यामुळे शहरातील तीव्र कोंडी कमी होण्यास मदत होण्याबरोबरच प्रवास अधिक जलद आणि पर्यावरणपूरक बनेल.
पुणे मेट्रो जाळे 100 किमी पार
नवीन मार्गांमुळे 2038 पर्यंत दररोज 7 लाख प्रवासी मेट्रोची सेवा घेतील, तर 2058 मध्ये हा आकडा 11.7 लाखांवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मंजुरीनंतर पुणे मेट्रोचे एकूण जाळे 100 किमीचा टप्पा ओलांडणार आहे.
वाहतूक कोंडीवर उपाय
सध्या पुण्यातील वाहतूक कोंडी मोठी समस्या बनली आहे. पीएमटी बसेसची जीर्ण अवस्था, तासन्तासचा ट्रॅफिक, वाढती वाहनसंख्या यामुळे मेट्रोच्या विस्ताराची मागणी जोर धरत होती. अखेर केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा महत्वाचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.


