Barshi Gram Sevak Suicide: बार्शी येथील ग्रामसेवक प्रकाश बाविस्कर यांच्या आत्महत्येने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, बाविस्कर यांना त्यांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. त्यांनी पैसे मागितल्याचा देखील आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या छळ आणि आर्थिक मागणीमुळे बाविस्कर यांनी १९ नोव्हेंबर रोजी आपल्या घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी प्रकाश बाविस्कर यांची पत्नी धावून गेल्या आणि त्यांनी बाविस्कर यांना तातडीने बार्शी ग्रामीण रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना, २६ नोव्हेंबर रोजी बाविस्कर यांचे निधन झाले.
पोस्टमार्टेम आणि कुटुंबीयांचा ठिय्या
कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यापूर्वी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी सांगितले की, आत्महत्येच्या प्रकरणात सध्या गुन्हा दाखल करता येत नाही, तरीही कुटुंबीयांनी आपले जबाब नोंदावेत. सध्या रुग्णालयाच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे, कारण कुटुंबीयांनी ठिय्या मांडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने देखील परिसरात तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा – चेतेश्वर पुजारावर कोसळला दुःखाचा डोंगर; मेहुणा जीत पाबारीने संपवलं जीवन
वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाची भूमिका
कुटुंबीयांच्या आरोपांनुसार, बाविस्कर यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सातत्याने त्यांच्या वर दबाव आणत होते. या प्रशासनिक छळामुळे बार्शीतील अन्य कर्मचाऱ्यांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.


