Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची हवामानाची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यभरात उन्हाचा कडाका वाढलेला असताना येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हिंदू नववर्षाचा सण असलेल्या गुडी पाढव्याच्या आसपासच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 18 आणि 19 मार्च दरम्यान पुणे आणि परिसरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुण्यासह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटू शकतो आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अचानक होणाऱ्या विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिक आणि शेतकऱ्यांना इशारा
या बदलत्या हवामानामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट बरोबर ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.


