पुणे: माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुण्यातून अपहरण झाल्याचा निनावी फोन पोलीस कंट्रोल रुमला आहे. पुणे विमानतळावरुन ऋषीराज सावंत यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलीस कंट्रोल रुमला दिली. तर ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले नसून ते फिरायला गेल्याची माहिती तानाजी सावंत यांच्या स्वीय सहायकाने दिली आहे. त्यामुळे पोलिसांना कॉल करून खोटी माहिती दिली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
दरम्यान संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला. राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाले आहे. पुणे विमानतळावरुन पांढऱ्या रंगाच्या स्विफ्टमधून अपहरण झाल्याची माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीने पुणे पोलिसांना दिली. या निनावी कॉलनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. त्यानंतर पोलीस अधिकारी तानाजी सावंत यांच्या कात्रजमधील निवास्थानी पोहोचले. पोलिसांना अपहरणाचा फोन आला असल्याने सावंत यांना कोणी खंडणीची मागणी करणारा फोन केला होता का? याची चौकशी सुरु झाली.
अपहरण झालेल्या मुलाच्या सुटकेसाठी पोलिसांकडून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. पोलीस उपायुक्त स्वत: रस्त्यावर उतरुन परिस्थितीचा आढावा घेत होते. संबंधित प्रकरण माजी मंत्र्याच्या मुलाशी संबंधित असल्याने पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही. पोलिसांकडून ऋषिराज सावंत यांचा शोध सुरु असतानाच तानाजी सावंत यांच्या स्वीय सहायकांनी त्यांचे अपहरण झाले नसून ते फिरायला गेले असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांना कोणी तरी फोन करुन फेक कॉल केला का? याचा शोध घेण्यात येत आहे.


