पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने पुण्यातील लोकप्रिय इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. PMPML बसमध्ये परवानगीशिवाय रील शूट करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आणि महिला कंडक्टरचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. नोटिशीनुसार, अथर्वने महामंडळाचा अधिकृत गणवेश, ई-तिकिटिंग मशीन आणि बॅज यांचा बेकायदेशीर वापर केला आहे.
PMPML च्या अधिकाऱ्यांनी नोटिशीत म्हटले आहे की, या रीलमुळे सार्वजनिक सेवेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची प्रतिष्ठा, मानसिक स्वास्थ्य आणि व्यावसायिक प्रतिमा याला धक्का बसला आहे. यामुळे महामंडळाची सार्वजनिक विश्वासार्हता आणि प्रतिमा खराब झाली असून, अंतर्गत नियमांचे उल्लंघन झाले आहे.
PMPML चे कडक निर्देश
- संबंधित रील तात्काळ इंस्टाग्रामवरून हटवावी
- पूर्व लेखी परवानगीशिवाय PMPML बसेस किंवा ऑपरेशन्सशी संबंधित कोणतेही फोटो, व्हिडिओ किंवा कंटेंट प्रसारित करू नये.
- नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत शंकरशेट रोड, स्वारगेट येथील PMPML मुख्यालयात हजर राहून लेखी स्पष्टीकरण सादर करावे.
- PMPML ने इशारा दिला आहे की, निर्देशांचे पालन न केल्यास लागू कायद्यांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
View this post on Instagram
अथर्व सुदामेची पार्श्वभूमी काय?
अथर्व सुदामे याला सोशल मीडियावरील कंटेंटमुळे अडचणीत येण्याची ही पहिली वेळ नाही. गणेशोत्सवादरम्यान त्याने बनवलेल्या एका रीलवरून मोठा वाद झाला होता. त्यावेळी त्याला माफी मागणारा व्हिडिओ पोस्ट करून रील डिलीट करावी लागली होती.
या नोटिशीमुळे सार्वजनिक वाहतूक कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा आणि कामाच्या वातावरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी कंटेंट बनवताना कायद्याचे आणि नैतिकतेचे पालन करावे, असा संदेश या घटनेतून मिळतो. अथर्व सुदामे यांची पुढील प्रतिक्रिया काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


