पिंपरी: एमआयडीसी भोसरी आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी रविवारी (दि.२७) गुन्हे दाखल करण्यात आले.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात कृष्णा म्हेत्रे (वय २८, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजीवाडी चौक, मोशी येथे कृष्णा यांचा भाऊ ज्ञानगोंडा सिद्राम म्हेत्रे (वय २६) यांच्या दुचाकीला एका दुचाकीने धडक दिली. या अपघातात ज्ञानगोंडा म्हेत्रे हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत दुचाकी चालक तुषार हनुमंत निगडे (वय २७, रा. शिवाजीवाडी, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी (दि.२७) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडला.
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी-मरकळ रोडवर सोलू येथे २२ एप्रिल रोजी अपघात झाला. विशाल सुधाकर राठोड (वय २५) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र बाबूसिंग आडे (वय ४४, रा. वाशिम) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरद शेषराव सुर्वे (वय २९, रा. आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद सुर्वे याने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगात चालवून विशाल राठोड यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विशाल यांच्या डोक्याला, पायाला, तोंडाला गंभीर दुखापत झाली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.


