Baner Cancer Hospital: पुणे महानगरपालिकेच्या बाणेर येथील नवोदित अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाच्या नामकरणावरून गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय आणि सामाजिक वादावर अखेर अंतिम तोडगा निघाला आहे. या रुग्णालयाला पुण्याच्या माजी महापौर आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे नाव देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या या माहितीमुळे रुग्णालयाच्या नावावरून सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
विरोधकांचा आक्षेप आणि यशवंतराव भिमाले यांच्या नावाचा प्रस्ताव
बाणेर येथे पुणे महापालिका आणि ‘आपुलकी’ संस्थेच्या माध्यमातून ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) तत्त्वावर १५० खाटांचे सुसज्ज कॅन्सर रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी त्यांचे वडील स्वर्गीय यशवंतराव भिमाले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, यासाठी कोणतीही अधिकृत कायदेशीर प्रक्रिया राबवली गेली नसल्याचा आरोप करत विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याला तीव्र विरोध केला होता. सार्वजनिक प्रकल्पांना राजकीय नेत्यांच्या नातेवाइकांची नावे देण्याची पद्धत चुकीची असल्याचे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता.
कर्करोग रुग्णांसाठी ‘प्रेरणादायी’ निर्णय
भावनिक ऋणानुबंध: मुक्ता टिळक यांचे निधन कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर झाले होते. आजारपणाच्या अत्यंत कठीण काळातही त्यांनी जनसेवेचे व्रत सोडले नव्हते. त्यामुळे या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला त्यांचे नाव देणे हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, व्याधीशी झुंजणाऱ्या हजारो रुग्णांना धैर्याचा आणि जगण्याचा संदेश देणारा एक भावनिक निर्णय मानला जात आहे.
चार वेळा नगरसेविका ते पुण्याच्या पहिल्या भाजप महापौर; असा होता मुक्ता टिळक यांचा प्रवास
स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कुटुंबातील पणतसून (शैलेश टिळक यांच्या पत्नी) असलेल्या मुक्ता टिळक या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ आणि निष्ठावान नेत्या होत्या. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून सलग चार वेळा नगरसेविका म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. २०१७ मध्ये जेव्हा पुणे महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली, तेव्हा पक्षाने त्यांच्याकडे पुण्याचे महापौरपद सोपवले. २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी शहराचे प्रथम नागरिक म्हणून उत्तम काम केले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या कसबा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेल्या. २२ डिसेंबर २०२२ रोजी वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. कर्करोगाच्या गंभीर आजाराशी लढा देत असतानाही, त्यांनी व्हीलचेअरवरून मुंबईला जाऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत बजावलेले मतदानाचा हक्क त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कर्तव्याची प्रचिती देणारा ठरला, ज्याची चर्चा आजही राजकीय वर्तुळात केली जाते.


