NCP Politics : पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून डावलण्यात आल्यामुळे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू असतानाच, आता त्यांच्या विरोधात थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
ही तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी केली असून, जगताप यांनी गेल्या वर्षभरात शहर कार्यकारिणी जाहीर न करता निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रामदास गाडे पाटील हे पर्वती विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी दिलेल्या पत्रात सुभाष जगताप यांना पक्षाने यापूर्वी अनेक महत्त्वाची पदे दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थायी समिती अध्यक्षपद, २०१४ मधील विधानसभा उमेदवारी आणि २०१७ मधील पराभवानंतर स्वीकृत नगरसेवक पद देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतरही शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र यंदा पुन्हा स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्यामुळे जगताप पक्षावर नाराज असल्याचा दावा गाडे यांनी केला आहे.
शिस्तभंग कारवाईची मागणी
गाडे पाटील यांनी आपल्या तक्रारीत, “पक्षाने एवढी संधी दिल्यानंतरही पक्षाविरोधात भूमिका घेणे योग्य नाही,” असे नमूद करत सुभाष जगताप यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
नेमकी नाराजी कशामुळे?
या वादामागे पुणे शहराच्या पश्चिम भागातील रखडलेली कार्यकारिणी हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. सुभाष जगताप यांची २ जून २०२५ रोजी पश्चिम पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्याचवेळी पूर्व भागासाठी माजी आमदार सुनील टिंगरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
टिंगरे यांनी तातडीने कार्यकारिणी जाहीर करून पदवाटप केले. मात्र, सुभाष जगताप यांनी अद्याप पश्चिम भागाची कार्यकारिणी जाहीर न केल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडींमुळे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


