पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे रुग्ण वाढत असताना शहराचा होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना खासगी टँकर, पाण्याचे जार विकत आणावे लागत आहे. शिवाय हे पाणीही अशुध्द असल्याने परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत गुइलेन बॅरे सिड्रोम (जीबीएस) आजाराचे ३० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराचा प्रसार दूषित पाण्याद्वारे सर्वाधिक होत असल्याने शहरातील खासगी विहिरी, बोअर, टँकर आणि जारमधील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे पाणी शुध्दीकरण केंद्र सील केले आहेत. सध्या रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही. खरे तर नागरिकांसाठी दीर्घकाळापासूनची समस्या आहे. या परिसरात अपुरा आणि कमी दाबाचा पाणीपुरवठा कायम होताना दिसून येत आहे. या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी या भागातील माजी नगरसेवक नाना काटे यांनी अनेकदा आयुक्तांना निवेदनेही दिली आहेत.
मात्र, तात्पुरता पाणीपुरवठा सुरळीत होतो आणि पुन्हा नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून उन्हाच्या झळा आतापासूनच सुरू झाल्या आहेत, त्यामुळे पाणी पुरवठ्याची मागणी वाढत आहे.
शहरात जीबीएस रुग्णांचे प्रमाण हे दूषित पाण्यामुळे वाढत असून त्या पाण्याचे शोध करण्यासाठी वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाण्याचे नमुने घेत ब्लिचिंग पावडर टाकून पिण्यायोग्य पाणी केले जात आहे. याकरिता खासगी विहिरी, बोअरवेल, जार, टँकरची ठिकाणी दररोज पाण्याची नमुने घेऊन तपासणी केली जात आहे. अशा परिस्थितीत महापालिका पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तरी रहाटणी-पिंपळे सौदागर येथील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


