Parth Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्याची तयारी मुंबईतील लोकभवनात सुरू झाली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची अधिकृत माहिती आहे.
दरम्यान, काल रात्रीच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार मुंबईकडे रवाना झाले होते. शपथविधीपूर्वीच एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली असून, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे केवळ उपमुख्यमंत्रीपदाचीच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पक्षाच्या नेतृत्वात मोठा बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधीमंडळ बैठकही पार पडणार असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील भेट, तसेच सुनेत्रा पवारांचा शपथविधी या दोन्ही घटनांमुळे राज्याच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचं चित्र आहे. सर्वांचे लक्ष आता पुढील घडामोडींवर लागून राहिले आहे.
‘शपथविधीबाबत आम्हाला माहितीच नव्हती’ : शरद पवार
सुनेत्रा पवार यांनी केवळ प्रतिभा पवार यांना फोन करून मुंबईला शपथविधीसाठी जात असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “या विषयावर आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. शपथविधी होणार आहे, याचीही आम्हाला माहिती नव्हती. पक्ष आणि त्याचे नेते कोणते निर्णय घेतात, हा त्यांचा अधिकार आहे.”
‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, हीच दादांची इच्छा’
याच वेळी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली. “दोन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात, ही दादांची मनापासून इच्छा होती. ती इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे,” असे त्यांनी भावूक शब्दांत सांगितले.


