इंदापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष आणि अनुभवी नगरसेवक प्रदीप गारटकर यांना आगामी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. गारटकर यांच्या दीर्घ राजकीय अनुभवामुळे आणि शहर विकासातील योगदानामुळे त्यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट दिसते. बुधवारी इंदापूर शहरातील अल्फा बाईट सभागृहात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे म्हणाले, १९९२ पासून इंदापूरच्या नगरपालिकेतील कामकाजात प्रदीप गारटकर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेनं तीन वेळा सत्ता मिळवून विकासाच्या दिशा ठरवल्या. शहराच्या प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वाची पुन्हा गरज आहे. माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस यांनी सांगितले की, गारटकर यांनी अद्याप उमेदवारीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, पण कार्यकर्त्यांची इच्छा स्पष्ट आहे.
हेही वाचा – जमिनीचा घोटाळ्याच्या आरोपानंतर पार्थ पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले…,
माजी नगरसेवक अनिल राऊत यांनी म्हटलं की, १९९२ पासून झालेली विकासकामे आणि शहराचा बदल हा गारटकर यांच्या नेतृत्वाचं प्रतिक आहे. त्यामुळे उमेदवारी त्यांनाच द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी गारटकर यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासासाठी केलेल्या उपक्रमांचा उल्लेख करत त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं. पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठी अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्णय कळविण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रदीप गारटकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कार्यकर्त्यांच्या भावनेचा नक्कीच आदर केला जाईल. आता इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) कोणावर विश्वास ठेवतो, हे पाहण्यासाठी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले आहे.


