Pune Airport: पुणेकरांना अभिमान वाटावा अशी बातमी आहे. २०२५ मध्ये प्रवाशांच्या समाधान आणि सेवा गुणवत्तेच्या बाबतीत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) सर्व विमानतळांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) च्या एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (ASQ) सर्वेक्षणात पुणे विमानतळाने सलग तीन तिमाहीत उल्लेखनीय गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. या सर्वेक्षणानुसार पुणे विमानतळाला पुढीलप्रमाणे गुण मिळाले आहेत.
पहिली तिमाही : 4.92/5
दुसरी तिमाही : 4.94/5
तिसरी तिमाही : 4.96/5
या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे विमानतळाची जागतिक क्रमवारी ५९ वरून ५६ वर पोहोचली आहे. एएआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांच्या समाधानाला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि जागतिक दर्जाची सेवा देणे हे आमचे ध्येय आहे. पुणे विमानतळाने प्रवास अनुभवात एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
सेवा उत्कृष्टतेचे प्रतिक
ACI-ASQ सर्वेक्षण रांगेचा वेळ, सुरक्षा तपासणी, स्वच्छता, कर्मचारी वर्तन आणि डिजिटल सुविधा यांसारख्या घटकांवर आधारित असते. तज्ज्ञांच्या मते, पुण्याचा ४.९६ गुणांचा स्कोअर ही केवळ आकडेवारी नसून सेवा उत्कृष्टतेचे प्रतिक आहे. विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न, डिजिटल अपग्रेड आणि प्रवाशांच्या अभिप्रायावर आधारित सुधारणा यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले. नवीन स्मार्ट सुरक्षा लेन, सुधारित लाउंज आणि विविध जेवण पर्याय यामुळे प्रवाशांच्या सोयींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा – नव्या वर्षात पुणेकरांना मोठी भेट..! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो होणार सुरु, तारीख आली समोर
तज्ज्ञांच्या मते, पुणे विमानतळाचे हे यश भारताच्या जागतिक विमान वाहतूक प्रतिष्ठेला नवे बळ देते आणि भविष्यात अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे आकर्षित करण्यास मदत करेल. एएआयच्या व्यवस्थापनाखालील सातत्यपूर्ण सुधारणा यामुळे पुणे विमानतळ आज देशातील उत्कृष्टतेचे मॉडेल बनले आहे.


