पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात रोहन बोंबे या मुलाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखून धरला. वन विभागाच्या निष्क्रियतेला आणि बिबट्या हल्ले रोखण्यात अपयशाला कंटाळून “बिबट्या मुक्त परिसर”च्या मागणीसाठी हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.
आंदोलनात देवदत्त निकम, सुरेश भोर, अरुण गिरे यांच्यासह सुमारे २५० जण सहभागी होते. मंचर पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवणे, रास्तारोको करणे आणि सार्वजनिक कार्यात अडथळा निर्माण केल्याच्या कलमांतर्गत या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या २० दिवसांत पिंपरखेड आणि जांबुत परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला आहे. वन विभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश मिळालं आहे. गेल्या २३ वर्षांमध्ये दोन वेळा परवानग्या मिळूनही नरभक्षक बिबट्याला मारण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालं नव्हतं, पण आज प्रथमच हे यश मिळताना पाहून समाधान वाटतंय, असं माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.


